मंगलवार, 17 नवंबर 2020

ग्रंथालयांचे महत्त्व फार वाढले परंतु त्यामानाने विकास नाही (राष्ट्रीय ग्रंथालय आठवडा विशेष १४-२० नोव्हेंबर २०२०) The importance of libraries has increased greatly but there is no development in line with it (National Library Week Special 14-20 November 2020)

 

शिक्षणाचा कोणत्याही युगात किंवा भविष्यात, ग्रंथालयाशिवाय शिक्षणाचे अस्तित्व अशक्य आहे कारण ग्रंथालय हे शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे जेथे पूर्ण जगाचे ज्ञान आहे. पूर्वीपासूनच याचे महत्त्व सर्वोपरि ठरले आहे. देशाचे सुवर्ण भविष्य ग्रंथालयामध्ये तयार होत असते. सर्वात जास्त शैक्षणिक केंद्र असणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश भारत आहे. जर देशाची शिक्षण व्यवस्था बळकट करायची असेल तर प्रथम ग्रंथालय सक्षम करायला हवी. ग्रंथालय हे जीवनाचा एक आवश्यक भाग आहे आणि हा विद्वानांचा जीवनाचा तर अविभाज्य भाग आहे. अभ्यास, संशोधन, एखाद्या प्रश्नाचे निराकरण शोधण्यासाठी किंवा जगातील कोणत्याही विषयांवर नाविन्यपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथालये नेहमीच आपल्याबरोबर असतात. वाचकांच्या ज्ञानाची तृष्णा भागवण्याकरिता सज्ज असलेल्या ग्रंथालय माहिती विज्ञानाच्या क्षेत्रात नवे-नवे शोध लावले जात आहेत. आज ग्रंथालये संशोधन केंद्र म्हणून कार्यरत आहेत. पारंपारिक ग्रंथालयपासून आजच्या आभासी ग्रंथालयपर्यंत या क्षेत्राच्या प्रत्येक बाबींमध्ये बरेच प्रगतिशील बदल झाले आहेत.


क्षेत्रावार वेगवेगळी ग्रंथालय असतात. जसे :- राष्ट्रीय ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय, व्यावसायिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय, शासकीय ग्रंथालय याशिवाय विषय विभागानुसार विशेष ग्रंथालय आहेत जसे :- वैद्यकीय ग्रंथालय, रेल्वे ग्रंथालय, बँक ग्रंथालय, कारागृह ग्रंथालय, विभागीय ग्रंथालय,  संसद ग्रंथालय, विविध मंत्रालयांची ग्रंथालय, प्रांतीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय, कायदा ग्रंथालय, वृत्तपत्र ग्रंथालय, अंध वाचक विशेष ग्रंथालय, संगीत ग्रंथालय, बाल ग्रंथालय, सैन्य ग्रंथालय, मोबाइल (चालते-फिरते) ग्रंथालय, खाजगी ग्रंथालय वगैरे अशा प्रत्येक क्षेत्राचे आणि विभागाचे स्वतःचे ग्रंथालय असतात. जगातील कोणत्याही देशातील अत्यंत दुर्मिळ ग्रंथ, ताम्रपत्र लेखन, चित्रपट, मासिके, नकाशे, हस्तलिखित कागदपत्रे आणि ग्रंथ, ग्रामोफोन रेकॉर्ड, दृकश्राव्य रेकॉर्ड, ऐतिहासिक दस्तऐवज, जागतिक ख्यातनाम व्यक्तींचे संकलित दस्तऐवज जसे की विधिलिखित निर्णय, डायरी, पत्र, संभाषण रेकॉर्ड, मोहर आदेशपत्र आणि शेकडो वर्ष जुने असे अनेक अमूल्य साहित्य आपल्यासाठी इंटरनेटच्या एका क्लिकवर ग्रंथालयातून त्वरित उपलब्ध आहेत, या व्यतिरिक्त, ग्रंथालयात जगभरातील सर्व क्षेत्रांमध्ये विकसित केलेले साहित्य, कार्यक्रम, घटना, संशोधन, पेटंट्स आणि सध्याच्या क्रियाकलापांची संपूर्ण माहिती असते. वाचकांच्या गरजा भागविण्यासाठी नवीन संसाधने उपलब्ध करुन गुणवत्तापुर्ण ज्ञानाबरोबर वाचकांचा वेळही वाचविला जातो.

ग्रंथालय महत्वाचे आहे, मग विकास का नाही :- आज आपण आधुनिक युगात जगत आहोत, जगभरात ग्रंथालयांनी जलद प्रगती केली आहे. आपल्या देशातील आयआयटी, आयएएम, एम्स यासारख्या केंद्रिय संस्थानांची ग्रंथालये किंवा काही मोठ्या खासगी संस्थानांची ग्रंथालये विकसित दिसतात. पण जेव्हा आपण आजूबाजूच्या ग्रंथालये पाहतो तेव्हा असे दिसते की ग्रंथालयांचा विकास कुठे झाले आहे? देशातील हजारो लहान ते मोठी ग्रंथालये अविकसित दिसतात, जेव्हा की देशातील सर्वात मोठा वाचकवर्ग या ग्रंथालयांमधून आहे. या लायब्ररीत वाचकांसाठी अत्याधुनिक संसाधने पाहणे तर दूरच पण मूलभूत ग्रंथालयीन सेवा देखील उपलब्ध नाहीत. बर्‍याच लायब्ररीत साहित्याच्या नावावर काही मोजक्या वर्तमानपत्र येतात. शासनाने प्रत्येक क्षेत्र, विभाग, शाळा, महाविद्यालय, संस्था, समाज यांच्या विकासाकरीता ग्रंथालयाचे महत्त्व ओळखले आहे परंतु आम्ही अजूनही ग्रंथालयाच्या विकासामध्ये खूप मागास आहोत.

ग्रंथालयात तज्ञ कर्मचारीच नाही :- केवळ या क्षेत्रातील तज्ञ कर्मचारीच ग्रंथालयात वाचकांना अधिक चांगली सेवा देऊ शकतात. परंतु देशातील बर्‍याच राज्यांच्या शाळांमध्ये, विभागात अनेक वर्षांपासून ग्रंथालय कर्मचार्‍यांची भरतीच झालेली नाही. कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत परंतु त्यांचा ठिकाणी नवीन कर्मचारी येत नाहीत, अनेक ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा भरोश्यावर ग्रंथालय चालून राहिले आहेत. कुशल कामगार वर्ग, दर्ज़ेदार वाचन साहित्य, सुविधा, पुरेसा निधी यांची कमतरता आहे. स्थानिक प्रशासन (महानगरपालिका, नगरपालिका) यांच्या सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती अशीच आहे. वाचक मूलभूत सेवांपासून सुद्धा वंचित आहे. इतर विषय क्षेत्रातील ग्रंथालयांचीही स्थिती चिंताजनक आहे. अशा ग्रंथालयांमध्ये अद्ययावत संसाधने नसतातच आणि ग्रंथालय नियमांनुसार कामे सुद्धा होत नाहीत. एकीकडे आपण शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत आणि दुसरीकडे ग्रंथालयांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.

बरेच ग्रंथालये उध्वस्त होत आहेत :- देशातील हजारो ग्रंथालये त्यांच्या अस्तित्वाची शेवटची लढाई लढत आहेत म्हणजेच पुष्कळशा लायब्ररी पुरेशा निधीअभावी आणि चांगल्या व्यवस्थापनाच्या कमतरतेमुळे संपण्याच्या मार्गावर आहेत, तेथील मौल्यवान वाचन साहित्य नष्ट होत आहे, बर्‍याच लायब्ररीत वाचकांसाठी पुरेशी टेबल, खुर्च्या, पंखे, प्रकाश, पिण्याचे पाणी, शौचालये, तर कुठे वीज देखील नाही आणि ग्रंथालय इमारतींच्या खिडक्या, दारे, भिंती कमकुवत झाल्या आहेत. पावसाळ्यात आणखी वाईट परिस्थिती होते, ग्रंथालयाची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. छोट्या खेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंत सर्वत्र ही परिस्थिती दिसून येते. तरीही अशा परिस्थितीत वाचक मोठ्या संख्येने ग्रंथालये वापरत आहेत. उज्ज्वल भवितव्यासाठी अभ्यासाचे धोरण आणि स्पर्धा परीक्षांमुळे ग्रंथालयाकडे तरुणांचा कल वाढला आहे. ग्रंथालये वाचकांना शाळेपासून आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देतात आणि आज अशा अनेक ग्रंथालये स्वत:च्या शेवटच्या दिवसांवर पोहोचल्या आहेत.

प्रत्येक ग्रंथालयाचा विकास अत्याधुनिक व्हावा :- शिक्षणपद्धती सुधारीत करायची असल्यास ग्रंथालयांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे आहे. केंद्र, राज्य, स्थानिक प्रशासनाने अर्थसंकल्पात शिक्षणाव्यतिरिक्त ग्रंथालयासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य प्रदान केले पाहीजे. देशातील सर्व प्रकारच्या लायब्ररीत दरवर्षी आवश्यकतेनुसार भरती केल्या पाहिजेत. ज्याप्रकारे शहरे आता महानगराचे रूप घेत आहेत, वाढत्या लोकसंख्येनुसार शहरे वाढत आहेत, गरज वाढत आहे त्यानुसार ग्रंथालयांची संख्या वाढत नाही आहे. ग्रंथालयात अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी दूरदूरून येतात, देशात ग्रंथालयांची कमतरता आहे म्हणूनच ग्रंथालयांचा विस्तार अत्यंत महत्वाचा आहे. आयआयटी आयआयएमच्या ग्रंथालयासारखे ग्रंथालय प्रत्येक शहरात असायला हवी.

       प्रत्येक जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालय असावे जेणेकरून त्या जिल्ह्यातील सर्व शहरे व खेड्यांची सर्व ग्रंथालये त्यास पूर्णपणे जोडली गेली असावी जेणेकरून गाव-खेड्यातील प्रत्येक वाचकाला  गावातच आंतरराष्ट्रीय ग्रंथालयीन सुविधा संसाधन सामायिकरण आणि इंटरनेट द्वारे भेटू शकतील सोबतच शहरातील प्रत्येक प्रभागात, प्रत्येक गावात ग्रंथालये स्थापन कराव्यात. मोबाइल (चालते-फिरते) ग्रंथालय वेगवान करावी लागेल, शालेय शिक्षणाच्या अगदी सुरुवातीपासूनच मुलांना लायब्ररीचे महत्त्व शिकवले पाहिजे. प्रत्येक विद्यापीठाच्या ग्रंथालयाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय बनवून, विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला ऑनलाइन जोडले गेले पाहिजे. प्रत्येक शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक विभागाच्या लायब्ररीला ई-लायब्ररी तयार करायला हवी, जे त्यांचे साहित्य ऑनलाइन अपलोड करुन याला डिजिटल ग्रंथालयाचे स्वरूप देतील आणि आपल्या संस्थेचा ई-रिपॉझिटरी स्थापित करतील. आपल्या देशात, राज्यांचा शालेयस्तरीय ग्रंथालये आणि सार्वजनिक ग्रंथालयांची अवस्था फार गंभीर आहे. त्याला सुधारण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर ग्रंथालय माहिती विज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांच्या समिती स्थापन केल्या पाहिजेत. ही समिती सरकारकडे विविध स्तरांच्या ग्रंथालयांचे मूल्यांकन करून त्याच्या विकासात्मक बाबींवर सल्ले देतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालय तयार करण्याच्या पद्धतीवर देखरेख ठेवेल.

डॉ. प्रितम भि. गेडाम

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Do Leave Your Comments