ग्रंथालय हा वाचकांसाठी ज्ञानाचा
महासागर आहे, आज ग्रंथालयाशिवाय शिक्षण व सुसंस्कृत समाजाची कल्पनाच करता येत नाही.
आपल्या सर्वांच्या जीवनात ग्रंथालयाचे अमूल्य योगदान आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
प्रत्येक अडचणीत पुस्तकं माणसाशी खऱ्या मित्रासारखी सोबतीला असतात. हे तेव्हाही सोबत
असतात जेव्हा आपल्याला कोणी साथ देत नाही. ज्याने जीवनात ग्रंथालयाचे मूल्य समजले नाही,
त्याने उत्कृष्ट जीवन जगलेच नाही. ग्रंथालये वाचकांना त्यांचे जीवन सोपे, सुलभ, उज्ज्वल
आणि प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी सतत प्रेरित करून एक चांगला मार्ग तयार करतात.
ग्रंथालयांचे जाळे जगभर पसरलेले आहे, ग्रंथालयांच्या विकासासाठी सर्वात आवश्यक म्हणजे
तज्ञ कर्मचारी, योग्य वाचन साहित्य आणि पुरेसा निधीसह उत्कृष्ट व्यवस्थापन. विकसित
ग्रंथालये वाचकांना उत्तम सेवा देऊन देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतात. ग्रंथालय
हे शिक्षण केंद्रात ज्ञानाचे मुख्य स्त्रोत म्हणून ओळखले जाते. देशात दरवर्षी १४ ते
२० नोव्हेंबर रोजी "राष्ट्रीय ग्रंथालय आठवडा" मोठ्या उत्साहात साजरा केला
जातो. आज अत्याधुनिक लायब्ररी आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा समाविष्ट झाल्या आहेत, एका
क्लिकवर, आपल्याला जगभरातील ग्रंथालयांमध्ये सहज प्रवेश मिळतो.
जीवनात ग्रंथालयाची भूमिका अनमोल (The role of library in life is invaluable) :- जगात असेच देश विकसित झाले आहेत ज्यांनी शिक्षण क्रांतीचे महत्त्व समजून शिक्षणासोबतच त्यांना वाव देण्याकरिता ग्रंथालयांची उन्नती केली, कारण ग्रंथालये शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत, वेळेची बचत करून मनुष्याला योग्य दिशा देऊन ज्ञानी बनवतात. जगातील महान व्यक्तिमत्त्वांचे सोबती म्हणून पुस्तके ओळखली जातात. जे पुस्तकांशी मैत्री करतात, ते आयुष्यात कधीच एकटे नसतात. शालेय शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत ग्रंथालये मानवाला मार्गदर्शन करतात. जिथे शिक्षकालाही ज्ञानाची तळमळ असते, ते केंद्र म्हणजे ग्रंथालय. जीवनाचा अविभाज्य घटक असलेले ग्रंथालय आज उपेक्षेचे केंद्र बनले आहे. देशातील अनेक राज्यांतील सार्वजनिक व शैक्षणिक ग्रंथालयांमध्ये मूलभूत सुविधाही नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचे प्रचंड नुकसान होत आहे. ज्या वयात मुलं आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच वयात ग्रंथालयाच्या ज्ञानाच्या रूपाने महत्त्वाच्या मार्गदर्शनापासून ते वंचित राहतात, अशाने शिक्षणाचा पाया कसा बळकट होणार.
ग्रंथालयांकडे दुर्लक्ष म्हणजे सुशिक्षित समाजाचा विकास थांबवणे (Ignoring libraries means stopping the development of an educated society) :- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदार विभागाने ग्रंथालयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे आहे. ग्रंथालयांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांच्या भरतीकडे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे. ग्रंथालयातील सेवा-सुविधा आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी जबाबदार अधिकारी विभाग, व्यवस्थापन आणि प्रशासन यांनी भर देणे गरजेचे आहे. योग्य अर्थसंकल्पाअभावी अनेक ग्रंथालये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे ग्रंथालयांचे योग्य व्यवस्थापन आणि विकास करण्यासाठी योग्य निधीची सतत उपलब्धता असायला हवी, विशेषत ग्रामीण भागात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सर्व प्रकारचे स्थानिक प्रशासन महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, अनुदानित सार्वजनिक आणि इतर ग्रंथालये यांनी दरवर्षी आवश्यकतेनुसार ग्रंथालयीन कर्मचारी भरती करावी. ग्रंथालयाच्या पातळीनुसार व योग्यतेनुसार दरवर्षी ग्रंथालय वाचन साहित्य खरेदी केले जावे. आपल्या प्रत्येक जिल्ह्यात जागतिक दर्जाची अत्याधुनिक ग्रंथालये निर्माण करणे ही काळाची गरज आहे, देशाचे शैक्षणिक धोरण बळकट करण्यासाठी ग्रंथालये विकसित करायलाच हवी. सुशिक्षित समाजात ग्रंथालयांना योग्य स्थान देण्यासाठी सरकारने शिक्षणाबरोबरच ग्रंथालयासाठी विशेष बजेट करण्याचा विचार करायला हवा. प्रत्येक गाव, शहर, वर्ग, प्रत्येक विद्यार्थी, शेतकरी, गृहिणी, व्यापारी, नोकरदार आणि देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ग्रंथालयाचा लाभ पोहोचल्यास देशातील विकासाचे खरे चित्र दिसून येईल.
डॉ. प्रितम भी. गेडाम

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
Do Leave Your Comments