मंगलवार, 31 मई 2022

तंबाखूचे व्यसन म्हणजे महागडे आजार आणि अकाली वेदनादायक मृत्यू (जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष – ३१ मे २०२२)

माणूस हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे पण हाच माणूस कधी कधी आपल्या वाईट सवयींना क्षणिक आनंदाचे नाव देऊन समाजात समस्या निर्माण करण्यात सहभागी होतो. जीवनात तसेच अशुद्धता व दुर्गुणांचे जाळे पसरलेले आहे आणि त्यात नशा जीवनाला पूर्णपणे नरक बनवते. नशा कोणताही असो, तो वाईटच असतो. सहज उपलब्ध होणारे विष अर्थातच नशा म्हणजे "तंबाखू", जे हळूहळू माणसाला आपल्या तावडीत अडकवून वेदनादायकपणे संपवते. आज तंबाखूचे विष आपल्या समाजात अशाप्रकारे पसरले आहे की लहान मुलेही त्याच्या विळख्यात आहेत.

 डब्ल्यूएचओ नुसार मुख्य तथ्ये: - तंबाखूमुळे त्याच्या निम्म्या वापरकर्त्यांचा मृत्यू होतो. जगातील १.३ अब्ज तंबाखू वापरकर्त्यांपैकी ८०% पेक्षा जास्त लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. तंबाखूमुळे दरवर्षी ८ दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी सुमारे ७ दशलक्ष मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे होतात. तर अंदाजे १.२ दशलक्ष मृत्यू हे धूम्रपान न करणार्‍यांचे आहेत जे धूम्रपान करणाऱ्यांच्या (सेकंड हैंड) संपर्काचे परिणाम आहेत. लोक सिगारेट, बिडी यांसारखे तंबाखूजन्य पदार्थ जाळतात तेव्हा बंद जागा भरून निघणारा धूर म्हणजे सेकंडहँड स्मोक. दुसऱ्यांद्वारे केलेल्या धूम्रपानाचा धुराच्या संपर्कात येण्याची कोणतीही सुरक्षित पातळी नाही, यामुळे अकाली मृत्यू तसेच हृदय व श्वसनाचे गंभीर आजार होतात. जवळपास निम्मी मुले सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या धुरामुळे प्रदूषित हवेत नियमितपणे श्वास घेतात आणि दरवर्षी ६५००० मुले धुरामुळे होणाऱ्या आजारांमुळे जीव गमावतात. लहान मुलांमध्ये, अचानक शिशु मृत्यू सिंड्रोमचा धोका वाढतो. गर्भवती महिलांमध्ये, यामुळे गर्भधारणात समस्या आणि जन्माच्या वेळी मुलांचे वजन कमी होते.

अमेरिकन लंग असोसिएशनच्या मते:- अमेरिकेत २०२१ मध्ये तरुण ई-सिगारेट वापरकर्त्यांमध्ये, हायस्कूल विद्यार्थ्यांमध्ये फ्लेवर्ड ई-सिगारेटचा वापर ८५.८% आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ७९.२% होता. धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांचा मृत्यू सरासरी १० वर्षे आधी होतो. दररोज, १८ वर्षांखालील सुमारे २००० मुले त्यांच्या आयुष्यातील पहिली सिगारेट ओढतात आणि १८ वर्षाखालील ३०० पेक्षा जास्त मुले दररोज सिगारेट ओढणारे बनतात. धूम्रपान, हे यूएस मध्ये दरवर्षी ४८०००० पेक्षा जास्त अकाली मृत्यूसाठी जबाबदार आहे, ज्यात ४१००० पेक्षा जास्त मृत्यूंचा समावेश सेकंडहँड धुरामुळे मृत्यू होतो. तंबाखूमुळे आरोग्यसेवा खर्च आणि इतर आर्थिक नुकसान वार्षिक ३०० अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे.

देशात विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ अत्यंत कमी किमतीत सहज उपलब्ध आहेत. ग्लोबल एडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया, २०१६-१७ नुसार, भारतातील सुमारे २६७ दशलक्ष प्रौढ (१५ वर्षे आणि त्यावरील) तंबाखूचे सेवन करणारे आहेत, जे सर्व प्रौढांपैकी २९% आहेत. भारतात तंबाखूच्या वापराचा सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू, खैनी, गुटखा, तंबाखूसह सुपारी आणि जर्दा ही सामान्यतः वापरली जाणारी उत्पादने आहेत. तंबाखूचे धूम्रपानाचे प्रकार म्हणजे बिडी, सिगारेट आणि हुक्का. ३०.२% प्रौढांना कामाच्या ठिकाणी, ७.४% रेस्टॉरंटमध्ये, १३.३% सार्वजनिक वाहतुकीवर आणि २१% तरुण (१३-१५ वर्षे) बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी सेकंडहँड स्मोकच्या संपर्कात आहेत आणि घरी ११% सेकंडहँड स्मोकच्या संपर्कात आहेत. दरवर्षी सुमारे १.२ दशलक्ष भारतीय धूम्रपान आणि सेकंडहँड स्मोकच्या संपर्कामुळे मुर्त्यूमुखी पडतात, जे एकूण मृत्यूंपैकी ९.५% आहे. धूरविरहित तंबाखूच्या जागतिक ओझ्यापैकी ७०% भारताचा वाटा आहे. धूररहित तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी २३०००० हून अधिक भारतीयांचा मृत्यू होतो. भारतात सुमारे ९०% तोंडाचा कर्करोग धूरविरहित तंबाखूच्या वापरामुळे होतो. भारतातील २७% कर्करोग तंबाखूच्या सेवनामुळे होतात. समाजाला तंबाखूची मोठी किंमत मोजावी लागते.

जेव्हा कोणी तुम्हाला तंबाखूजन्य पदार्थ किंवा इतर कोणतेही मादक विष सामायिक करते किंवा ऑफर करते तेव्हा समजून घ्या की तुमच्यासोबत एक वेदनादायक मृत्यू सामायिक केली जात आहे, ज्याचा शेवट खूप दुःखद आहे. आयुष्य अनमोल आहे, जगभरातील संपत्ती घालवून सुद्धा आपण एक क्षणाचे आयुष्य विकत घेऊ शकत नाही, मग आपण नशेचा आहारी जावून आपल्याच जीवाचे शत्रू का होतोय. सुख असेल तर नशा, दु:ख असेल तर नशा, आता अनेकांच्या आयुष्यात नशा हा दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे, नशेसाठी फक्त निमित्त हवे असते. जीवनात आपली सर्वात जास्त काळजी घेणारे आपणच असतो. जर आपण स्वतःची काळजी घेतली नाही तर आपल्यासारखा बेजबाबदार दुसरा कोणी नाही कारण आपणच स्वतः आपली चिता सजवण्याच्या तयारीत असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तंबाखूजन्य पदार्थांपासून जेवढे उत्पन्न मिळते, त्यापेक्षा तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांचा उपचारावर अनेक पटींनी जास्त खर्च होतो.

जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला, नशेच्या विषाने आपले आणि आपल्या प्रियजनांचे आयुष्य वाया घालवू नका. जिद्द, इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, जबाबदारीची जाणीव आणि आनंददायी वातावरण आपल्याला व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करते. शासन, स्वयंसेवी संस्था, व्यसनमुक्ती केंद्रे आणि इतर मदत गट कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी सदैव आपल्या सोबत आहेत. तंबाखू सोडण्याबाबत मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी, नॅशनल टोबॅको क्विट लाइन सर्व्हिसेस - १८०० ११२ ३५६ (टोल फ्री) किंवा ०११- २२९०१७०१ वर मिस्ड कॉल देऊन नोंदणी करा, ही शासनाची एक विनामूल्य सेवा आहे, तसेच www.nhp.gov.in/quit-tobacco वेबसाइटवर लॉग इन करून नोंदणी करू शकता. जीवनाचे मूल्य समजून घ्या, नेहमी व्यसनमुक्त रहा, तणावमुक्त जगा.

डॉ. प्रितम भि. गेडाम

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Do Leave Your Comments