ज्या देशाचे शिक्षण दर्जेदार असणार तेच देश जगात अग्रगण्य प्रगतीपथावर असणार, हे निश्चीत आहे कारण देशाची पीढी तिथल्या शिक्षणावर घडत असते आणी पिढी तशीच घडणार जसे शिक्षण असणार. आपल्या देशाला स्वातंत्र मिळून 73 वर्षे होऊन गेली पण देशात शिक्षणाची काय स्थिती आहे.? जागतिक स्तरावर देशाचा शिक्षणात काय दर्जा आहे? असे म्हंटले जाते की शिक्षकासारखा दूसरा पवित्र पेशा नाही पण आज जीवनात किती टक्के शिक्षक/प्राध्यापक आंर्तमनाने गर्वीत होऊन सांगू शकतात की त्यांनी आपल्या पदाशी योग्यपणे न्याय केलाय?. देशाचा ऐवढा विकास झाला असून जगातील प्रतिष्ठित विद्यापीठात, शिक्षासंस्थानात आपल्या देशाचे नाव का येत नाही? आज देशाची लोकसंख्या 1.37 अब्जाहून जास्त आहे तरी सुद्धा कुठे आपल्याकडे शिक्षणात गुणवत्तेची कमतरता राहते? देशातील दरवर्षी लाखो विद्यार्थी चांगल्या शिक्षणासाठी परदेशी शिकायला जातात. देशातील शैक्षणिक विभागात नव-नवे लक्ष्य साध्य करण्याकरता शासनातर्फे पुष्कळशा योजनांचा निर्धार केला जातो ह्या कामाला कित्येक स्वयंसेवी संगठना देखील सोबतीला असतात. एवढं करून सुद्धा गुणवत्तेत वाढ होत नाही आहे. शिक्षणाचा मुख्य हेतु असतो मानवाला सुसंस्कृत सुशिक्षीत मार्गाने असा कर्तबगार बनवणे की जेणेकरून एक चांगली नौकरी व व्यवसाय करून वैध मार्गाने पैसा मिळवून आपल्या परीवाराचे योग्य पालन करून समाजाचा विकासात सहाय करू शकेल. पण हे उद्देश योग्यपणे पुर्ण होत आहे का? दरवर्षी देशात लाखो विद्यार्थी पदव्या घेवून विद्यापीठातून बाहेर पडतात पण त्या पदव्या फक्त नावाच्याच ठरतात कारण ते उत्कृष्ट कौशल्य पुर्ण मनुष्यबळ निर्माण करीत नाही म्हणजेच देशात गुणवत्तापुर्ण शिक्षणाचा मोठा अभाव आहे.
शिक्षण क्षेत्रात करीअर करू इच्छिता तर थोडा विचार करा :- आज आपण शिक्षण क्षेत्रातील कितीही मोठी पदवी घेतली तरी चांगल्या नोकरीची शाश्वती नाही आहे. नवोदय किंवा केंद्रिय विद्यालय व शासकीय शिक्षण केंद्र फार कमी आहेत जीथे नोकरीच्या संधी मिळतील पण बाकी ठिकाणी काय? आपल्याकडे खाजगी शिक्षणसंस्था मोठ्या प्रमाणावर आहेत. काही नावाजलेल्या संस्था सोडल्यातर कित्येक खाजगी शिक्षण केंद्रात तर एका मजूरापेक्षा ही कमी पगार मिळतो, तर कुठे-कुठे वर्षभर पगार सुद्धा होत नाही, आर्थीक अडचणी मुळे आता तर अशा ठिकाणी काम करणारे कर्मचारीचे आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. वर्षोवर्ष अनुदानीत शिक्षण क्षेत्रात भरत्या होत नाहीत. मोठ्या संख्येने विद्यापीठात, महाविद्यालयात व शाळेत कर्मचारीवर्गांचा जागा खाली पडल्या आहेत व काही-काही ठिकाणी कंत्राट पद्धतीने कर्मचारी लावून तात्पुरते काम चालवणे शुरू आहे. अनुदानीत शिक्षण केंद्रातील शिक्षणाची पातळी खालावली आहे असे परिणाम दिसून येतात. स्थानीक भाषा माध्यमांचा शाळा बंद पडत चालल्या आहेत. दरवर्षी महाविद्यालयांमधे विद्यार्थांचा सीटा खाली असतात. रोजगार मिळत नसल्याने विद्यार्थांचे आता व्यावसायीक शिक्षणातून मोह भंग होत आहे. विद्यार्थी न मिळाल्यास व्यावसायीक अभ्याक्रमाचे महाविद्यालय बंद पडत चालली आहेत. योग्य पगार न मिळाल्यास अशा महाविद्यालयात पात्रता धारक प्राध्यापक सुद्धा जायला इच्छुक नसतात, वरून शिक्षण क्षेत्रात प्रचंड बाजीरीकरण व भ्रष्टाचाराचा प्रभाव आढळतो.
शिक्षणाचे बाजारीकरण :- आजचा युगात नावाजलेल्या मोठ-मोठ्या शिक्षण केंद्रात शिक्षण घेणे हे काळाजी गरज नसून स्टेटस सींम्बल झालेय असे वाटते. नवालाची गोष्ट वाटते की काही-काही ठिकाणी प्राथमिक शिक्षण केंद्रात प्रवेशाची फी चक्क लाखो रुपयात घेतली जाते. नर्सरी ते उच्च पदवी घेण्यापर्यंत सगळेच शिक्षण महागळे झालेत. जर एवढेच महत्वाचे शिक्षण आपल्याला अशा शिक्षणकेंद्रातुन मिळत असेल तर भल्या मोठ्या संख्येत खाजगी कोचिंग क्लासेस का वाढलेत? म्हणजेच महागळे शिक्षण, साहीत्य सामग्री, सुखसोयी मुलांना देवून सुद्धा बाहेर कोचिंग लावावे लागतेच. मग एवढे शिक्षण, पैसा, वेळ घालवून सुद्धा विद्यार्थी जेव्हा उच्च शिक्षण घेवून चांगल्या नोकरीच्या शोधात समाजात वावरतोय तर स्पर्धेत मागे का पडतो? दर्जेदार शिक्षण का मिळत नाही. शिक्षणाची भूमिका फक्त पदवी घेण्यापुरती नसून विद्याथ्र्यांचे सर्वांगीण विकास करणे आहे.
शिक्षणात भ्रष्टाचाराचा प्रभाव :- शिक्षण संस्था समाज सेवेसाठी निर्मीत होतात मग हे आय निर्मितीचे साधन कसे होतात? शिक्षणासारखे पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचाराचा बोलबाला आहे देशात खूप मोट-मोठे घपले शिक्षण क्षेत्रात घडत आहेत. रोज आपल्याला बातमीपत्र व इतर माहीतीस्त्रोताद्वारे अशी समस्या कळतच असते. नौकरी लावून देण्याचा नावाखाली लाखो रुपयांची देवाण-घेवाण होते मग सामान्य किंवा गरीब परीवारातील कतृत्र्ववान उमेदवार उच्च शिक्षण घेवून सुद्धा योग्य पदावर कसा पोहोचणार? देशात शिक्षण क्षेत्रातील पुष्कळसे घोटाळे गाजले आहेत त्यात हे स्काॅलरशीप घोटाळे, स्टेशनरी बिल घोटाळे, शिक्षा साहित्य सामग्री खरेदी घोटाळे, शिक्षक भरती घोटाळे, फर्जी शिक्षक घोटाळे, मुन्नाभाई सारखे नकलची घोटाळे, गणवेष खरेदी घोटाळे, गुण वाढविण्याचे घोटाळे, मेरीट घोटाळे, पदव्या खरेदी सारख्या कित्येक शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे गुन्हे उघडकीस झाले आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी स्वता साक्षात्कार मधे स्विकार केले होते की अनुदानीत शिक्षणसंस्थेत नौकरी लावण्याचा नावाखाली आर्थीक व्यवहार होतो त्यावर आळा घालण्यासाठी शासन स्वत केंद्रिय पद्धतीने भरती करणार.
शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेकरीता अशा शिक्षकांची निवड व्हावी :- जागतिक स्तरावर शिक्षणकेंद्राचा आकडेवारीत आपला देश तीसरा क्रमांकावर आहे म्हणजे सर्वात जास्त शिक्षणसंस्था आहेत पण गुणवत्तेचा बाबतीत खूपच मागासले आहोत. यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे योग्य उमेदवाराचीच निवड व्हायला हवी. उमेदवार उच्च शिक्षीत, तज्ञ, बुद्धीजीवी, प्रशासनीक क्षमता असणारा, नवीन ज्ञाना साठी जिज्ञासू, संशोधनाला प्रोत्साहन देणारा, जातीभेद लिंगभेद धर्मवादापासून दूर राहून शिक्षण हितासाठी काम करणारे व्यक्तीमत्व शिक्षण क्षेत्रात असावे. कित्येक सर्वे द्वारे असे कळले आहे की देशात फक्त 20 टक्के शिक्षकच योग्य प्रकारे काम करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात मोठमोठ्या पदावर काही व्यक्तीगत असे बसले आहेत जे प्राथमिक शाळेत सुद्धा लागणे म्हणजे गुन्हा होईल. जर शिक्षकच असे असणार तर ह्या क्षेत्रातून निर्मीत होणारे उत्पाद देखील खालच्या दर्जाचेच असणार. कित्येक शिक्षकांना स्वताचा विषयाबद्दलही जाण नसते. आपले प्राध्यापक संशोधनात देखील खूप मागे आहेत. अशा समस्येवर नेहमी सोशल मिडीयावर चर्चा रंगतांनी बघतच असतो व अशा शिक्षकांचे विडीयो बातम्या ही वायरल होतांनी दिसतात.
शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक/प्राध्यापक कसा असावा? :- शिक्षकाला मार्गदर्शक, कौशल्य पुर्ण शिक्षक, भविष्याचा वेध घेणारा दूरदर्शी, संशोधनकर्ता, विश्लेषक, विषयांचा गाळा अभ्यासक अशा पुष्कळशा गोष्टिंमध्ये निपुण असणे गरजेचे आहे कारण शिक्षकाला अशाच भूमिका पार पाळाव्या लागतात. अशाप्रकारे तयार राहण्याकरीता शिक्षकाचा अंगी जिज्ञासू प्रवृत्ति असायला हवी म्हणजे आपल्या क्षेत्रातील नवनवीन माहितीचा भरमसाठ साठा निर्मीत होतो तो जाणून घेण्याकरता नेहमी तयार असायला हवे व अद्यावत रहायला पाहीजे सोबतच शिक्षक मृदूभाषी, सहकार्य, शिस्तप्रिय, वेळेच महत्व समजणारे, अनुशासन, प्रामाणिक, कर्तव्यवान, कर्तबगार व आपल्या विषयाचा विकासासंबंधी प्रयत्नशील असणारे असे गुण असायला हवे. तसे बघीतले तर संपुर्ण देश हा शिक्षकांचा कारकिर्दीवरच अवलंबून आहे म्हणजे देशाला घडविण्याचे कार्य शिक्षकच करीत असतो. मानव आपल्या जीवनातील मोठा भाग शिक्षण घेण्यासाठीच घालवतो तेव्हा त्या पीढीला योग्य आकार देण्याची मोलाची जबाबदारी शिक्षकाची असते. शिक्षकाची वागणूक विद्यार्थांसमोर आदर्श चारित्राची असायला हवी. शिक्षक हा निर्व्यसनी, अवैध आर्थिक व्यवहारापासून दूर असणारा, वाईट परीश्थितीत ही न डगमगणारा, सत्याचा मार्ग दाखविणारा, चांगल्या कामासाठी पुढाकार घेणारा, नेहमी विद्यार्थांचा विकासासंबंधी विचार करणारा, समाजात आदर्श निर्माण करणारा शिक्षक असायला हवा.
डाॅ. प्रितम भि. गेडाम

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
Do Leave Your Comments