एक समाजवादी राष्ट्र या भूमिकेतून सामाजिक न्याय ही संकल्पना समताधिष्ठित समाजनिर्मितीकडे जाणारी आहे. सामाजिक न्याय या विस्तृत संकल्पने मध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. त्यामध्ये दलितांचे प्रश्न. उदा. प्रतिनिधित्व, आरक्षण, अट्रॉसिटी, विषम वागणूक इत्यादी. आदिवासींची प्रश्न. उदा. जंगल आणि जमिनीवरचा हक्क, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्या विषयीच्या समस्या इत्यादी. स्त्रियांचे प्रश्न उदा. प्रतिनिधित्व, अन्यायी वागणूक, कौटुंबिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, बलात्कार, कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण, स्त्रीभ्रुण हत्या, हुंडा बळी, ऑनर किलींग इ. तसेच अपंगांच्या समस्या, वृद्धांच्या समस्या, मानवी अंग व्यापार, बाल कामगार, झोपडपट्टयांचे प्रश्न, शिक्षणाच्या समस्या विशेष करून ग्रामीण भागातील शिक्षण तसेच आरोग्य, कुपोषणाची समस्या या सर्व बाबींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. सामाजिक न्याय हे कल्याणकारी राज्याचे एक वैशिष्ट्य आहे.
जागतिक सामाजिक न्याय दिवस दरवर्षी संपुर्ण जगात 20 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. 26 नोव्हेंबर 2007 रोजी संयुक्त राष्ट्र महासंघाने ह्या दिवसाला सामाजिक न्याय दिवस म्हणून घोषित केलाय व पहिल्यांदा 2009 साली हा विशेष दिवस साजरा करण्यात आला. स्त्री-पुरूष समानता किंवा लोकांचे आणि स्थलांतरांचे स्वाधिकार यांना प्रोत्साहन देण्याकरता सामाजिक न्यायाची मुल्ये जपली जातात यामधून लोकांमधे लिंग, वय, वांशिक, धर्म, रंग, संस्कृती किंवा जातपात, अपंगत्व अश्याबाबतीत असलेल्या अडथळ्यांना दूर करण्याकरता सामाजिक न्यायाला जपले जाते. शासनाच्या द्वारे समाजाचा तळ्यागळ्याचा विकासाकरीता खूप धोरण राबवले जातात पण जनजागृतीच्या कमतरतेमुळे व इतर कारणाने त्या योजना लाभाथ्र्यापर्यंत किंवा सामान्य जनतेपर्यंत ते पोहोचतच नाही.
सामान्य माणसाचा जिवनात कित्येकदा सामाजिक अन्यायाची गोष्टि दृष्टिगत होत असते तरी ही अधिकतर मानव वर्ग ह्या अन्याया विरूद्ध काहीही बोलत किंवा सामोरी जात सुद्धा नाही. भिती व अज्ञानते मुळे अन्यायाचे पुष्कळदा विरोध ही होत नाही जेव्हा की समाजामधे सर्वांना समानतेचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्राचा आर्थिक विभागाचे असे म्हणणे आहे की जागतिक स्तरावर एवढे प्रयास करून ही श्रीमंत आणखी श्रीमंत व गरीब गरीबच होत चालले आहेत ही एक सत्य आहे. गरीबी रेषेखालील जिवनयापन करणारे गरीब जगात मोठ्या प्रमाणावर आहेत जागतिक स्तरावर श्रीमंत लोकांची संख्या वाढतच आहे त्याप्रकारे गरीबांची लोकसंख्या पण प्रचंड वाढत आहे. आज आपण शिकूण सवरून खूप प्रगती केली असली तरीही आपल्या समाजात जाती वादाच्या समस्या नेहमीच दिसून पडतात. कित्येक ठिकाणी छोट्या-छोट्याश्या गोष्टीवरून अत्याचार व दंगली घडतात. लोकांचा मानसीकते मधे जोपर्यंत सर्व समाज एक आहे आणि आपले आहे ही भावना नाही राहणार तो पर्यंत ह्या समाजाचे काही खरे नाही. खूप सार्वजनिक कामाचा ठिकाणी भ्रष्टाचार, ओळख, सिफारशी शोषण च्या बळावर कामे चालवली जातात असे खुपदा उघडकीस येत असते बातम्या वर्तमानपत्रा द्वारे नेहमीच बघत असतो. आजच्या आधुनिक काळात सुद्धा ग्रामिण भागात शव करीता अम्बुलंस ही मिळत नाही. कित्येकदा दवाखन्याकरीता पुष्कळ किलोमीटर दूर पर्यंत रूग्णांना भरकटत जावे लागते. पुष्कळ ठिकाणी ग्रामिण भागाततर पंचायतीत वेगळे कायदे राबवले जातात व ते तेथील नागरीकांवर लादतात ही. लहान लहान मुले भूक-भूक म्हणून जिव गमवू लागले, शेतकरी कर्जाचा ओझोने गळफास लावत आहेत, असंगठित मजूरांवर ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येतात. पैसा लोकांचा देव झालाय. न्यायासमोर सर्व व्यक्तिगण सारखे आहेत तरीही समाजात गरीब आणि श्रीमंत रसूकदार व्यक्तिंना समाजात सारखी वागणूक मिळत नाही.
सामाजिक अन्याय समाजात खूप क्षेत्रात आढळते. आपल्या समाजात वर्षापासून समानते व न्याय करीता प्रयत्न चालूच आहे. देशातील ईतीहासात सामाजिक न्यायचा क्षेत्रात कित्येक महान व्यक्तिगण होऊन गेले. राजा राम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, एनी बेसेंट, मदर टेरेसा, विनोबा भावे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, रानडे, महात्मा गांधी, बाबा आमटे सारख्या असाधारण लोकांनी आपले संपुर्ण जिवन सामाजिक न्यायाकरीता अर्पण केले.
सामाजिक न्याय दोन प्रकारचे असतात प्रथम म्हणजे, औपचारिक न्याय, जे न्याय संस्था कायद्यांमधील तरतुदींनुसार दोषी व्यक्तींना शिक्षा देऊन कार्यवाहीत येतो. अशा सामाजिक न्यायाचे स्वरूप कायदेशीर आणि गुन्हेगारीशास्त्राशी निगडित असते. अशा न्यायाचे स्वरूप ‘देवाने दिलेली शिक्षा’ असेही मानले जाते. ‘देवाने दिलेले शासन’ हा एक सिद्धांत मानस शास्त्रीय साहित्यात महत्त्वाचा मानला जातो. दुसरा म्हणजे, अनौपचारिक न्याय, जे नैतिकता आणि राजकीय परिस्थितीशी संबंधित असतो. तो विधायक आणि माणुसकीचा निकष लावून समाजात उपलब्ध असलेल्या चांगल्यावाईटाचे वाटप करण्या वरून दिला जातो. योग्य निकष लावून हक्काचे वितरण केले जाते. यामध्ये दोषी लोकांना शिक्षा दिली जाते, ती केवळ इतरांनी पुन्हा वाईट वागू नये म्हणून. ह्या शिक्षेमुळे पीडितांना, दुर्बलांना सामाजिक न्याय पूर्णपणे मिळत नाही परंतु अशा होणार्या शिक्षा तात्पुरत्या दहशत निर्माण करतात.
थोर विचारवंत बॅरिस्टर नाथ यांनी लोकशाही विषयी असे म्हटले आहे, की जनतेचे दुःख, जनतेचे सुख, जनतेच्या आशा, जनतेच्या आकांक्षा, जनतेची स्वप्न ही सरकारची स्वप्न असतात, जनतेचे दुःख हे सरकारचे दुःख होते, जनतेच्या आशा या सरकारच्या आशा होतात, जनतेला ठेच लागते आणि ज्या सरकारच्या डोळ्यांत पाणी येते, जनता रक्तबंबाळ होते आणि सरकार विव्हळू लागते तीच खरी लोकशाही. आजच्या लोकशाहीचे स्वरूप तर कोणाच्याही ध्यानात येते. उलट असे तर झाले नाही की, या देशातील जनतेवर अन्याय अत्याचार करणार्या शोषण करणार्या, गुलामगिरी लावणार्या परकियांची राजवट संपली आणि त्याजागी स्वकियांची राजवट आली. कारण खेड्यापाड्यातील माणसांना आणि स्त्रियांना जर या प्रश्नाचे उत्तर विचारले तर ते नकारार्थी देता येईल का, हे तपासून पाहिले तर निराशाच पदरी पडते.
ग्रामीण भागातील वृद्ध औषधांपासून तसेही वंचित असतात. जिथे पोटच भरत नाही, तिथे औषधांचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे म्हातारपण म्हणजे उपाशी राहणे आणि वेदना सहन करीत मरणाची वाट पाहणे, एवढेच त्यांना माहीत असते. त्यातूनही पुरुषाला सातबारा त्याच्या नावावर असला तर किमान भाकरी तरी मिळते. पण वृद्ध स्त्री फक्त कष्टाची व वेदना सोसण्याची धनी ठरते. मोफत मिळणाऱ्या गोष्टी तर खेड्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्याआधी त्या भ्रष्टाचाराने खाऊन टाकलेल्या असतात. त्यामुळे खरंच ज्यांना समाजसेवा करायची आहे, त्यांनी किमान बामच्या बाटल्या जरी खेड्यात वृध्दांना वाटल्यात तरी त्यांच्या तळमळणार्या जिवांना दिलासा मिळेल. आणि मरता मरता त्या जिवांना शांत मरण मिळेल. तसे या सामाजिक न्यायाबद्दल आपण नेहमीच बोलतो. पण नुसतेच बोलतो, खरे ना? हा समाज आपलाच आहे तेव्हा आपल्या द्वारे समाजाचे जे काही विकास होऊ शकेल ते सर्व प्रयत्न प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. आजही समाजात खूप मोठा भाग हा विषमतेमुळे विकासापासून वंचीत आहे. त्या भागाला सुद्धा विकसीत होण्याचा समान हक्क आहे व त्याकरीता सर्वानी एक होऊन काम केलेच पाहीजे जेव्हा ही संकल्पना तुमच्या-आमच्या सगळ्याचा मनात घर करेल तेव्हाच सामाजिक न्यायाला योग्य यश मिळेल.
डाॅ. प्रितम भि. गेडाम
